संस्कार रुजवणुकीचे महत्व- राजेश वाघ सर बुलढाणा

🌻आजचा अनुभव..🌻

   शाळेतील परिपाठ हे मला आवडलेलं अन माझं हक्काचं व्यासपीठ.मागील काही वर्षात परिपाठातून मी अनेक विषय मांडले, अनुभव सांगितले..

आज माझ्याकडे एक मुलगा आला आणि म्हणाला,सर आमच्या घरी काल साप निघाला होता पण मी तो मारला नाही.मी चमकुन् विचारलं मग काय केलं ? तर एका माणसाला बोलावले व त्याने तो पकडून नेला असे तो म्हणाला..
        आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला, नागपंचमीला माझ्या शाळेच्या मैदानावर शहरातील नामांकित मराठी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांशी मी निसर्गसाखळीतील महत्वाचा घटक- साप या बद्दल बोललो होतो..
सापाबद्दल समज-गैरसमज, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांचा मित्र या अनुषंगाने बोलताना साप दिसल्यास मारू नका, सर्पमित्रांना बोलवा असं आवाहन मी केलं होतं..त्याचाच हा दृश्य परिणाम होता.
     मित्रहो, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधन्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणजे परिपाठ..
शिक्षकांनी ठरवून, नियोजन करुन अंमलबजावणी केल्यास परिपाठाद्वारे आपण विद्यार्थ्यांना सर्वंकष,सर्वस्पर्शी अन सप्तरंगी प्रेरणा देवू शकतो..वैज्ञानिक जाणिवांची प्रभावी रुजवणूक करू शकतो.संस्कारक्षम वयात केलेली मूल्यांची रुजवणूक,केलेले संस्कार कायम अन चिरकाल टिकणारे असतात..
वैज्ञानिक दृष्टिकोण, निर्भयता, सत्यप्रियता, निसर्गप्रेम, स्त्री पुरुष समानता ही मूल्ये बोधकथा, उद्बोधक अनुभवातून सहज रुजवता येतील..परिपाठातील बदलते समुहगीत,बातम्यांमध्ये वैज्ञानिक घटनांचा जानिवपूर्वक समावेश,आरोग्य,पाणी बचत, वीज बचत,ऊर्जा बचत याबद्दल जागरूकता निर्माण करता येईल...
👉आणि हो माहिती संकलित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतूक अन पाठीवर शाबासकीची थाप देवून पाहा..कितीतरी माहिती मुलेच गोळा करून तुम्हांला देतील....
चला करुया का प्रयत्न मग..
~~ राजेश वाघ
जिल्हा परिषद हायस्कूल बुलडाणा..
09/09/2015

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post